सातारा प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती पुरस्काराने कराड तालुक्यातील किरपे गावची कन्या नवोदित आंतरराष्ट्रीय धावपटू प्राची देवकर (Prachi Deokar) हिला देऊन गौरवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
नंदा जाधव हिचा २५ वा स्मृतीदिन रविवार दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी गणेश मंदिर हॉल, संभाजीनगर , सातारा येथे साजरा होत असून प्रति वर्षाप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी किरपे (ता. कराड) येथील राष्ट्रीय धावपटू प्राची देवकर हिला २०२४ चा नंदा जाधव स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून क्रीडा प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे, आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष टी. आर. गारळे व सचिव सुरेश साधले यांनी केले आहे.
राष्ट्रीय शालेय स्पर्धेत ३००० मीटर व दक्षिण आशियाई मैदानी स्पर्धेत ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले आहे. दुबई येथे झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत तिचा सहभाग होता. तसेच हाँगकाँग येथे होणाऱ्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत ती सहभागी होत आहे.
नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठान गेली २५ वर्ष नवोदित खेळाडूंचा सत्कार, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विविध क्रीडा स्पर्धांना मदत, दिव्यांग स्पर्धा आदी उपक्रम राबवत आहे. आतापर्यंत ३००० हून अधिक रक्तदात्यांनी नंदा जाधव हिच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी रक्तदान केले आहे.