‘मी विधानसभा निवडणूक लढणार अन् जिंकणार सुद्धा’; प्रभाकर देशमुखांनी दिलं गोरेंना खुलं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीनंतर आता सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार जयकुमार गोरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसच्या रणजितसिंह देशमुखांनी दंड थोपटले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी भाजप आमदार गोरे यांना थेट आव्हानच दिलं आहे. “धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार होऊन फक्त दोन महिनेच झालेत. दोन महिन्यांत त्यांना जनतेचं दुःख समजलंय. मात्र, पंधरा वर्षे आमदार असलेल्या माणसाला हे समजलं नाही असा टोला देशमुख यांनी लगावत माण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे आणि मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे, असा खुललं आव्हान आमदार गोरे यांना दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथील संपर्क कार्यालयात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, भालचंद्र कदम, अॅड. संतोष पवार, हर्षदा देशमुख-जाधव आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी देशमुख यांनी आमदार गोरे यांच्यावर निशाणा साधला. देशमुख म्हणाले की, ”माण-खटावला २००९ पूर्वी जेवढे पाणी मिळाले, त्यातील तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय. आपल्या हक्काचे दोन हिस्से पाणी सांगली व सोलापूरला जात आहे. १९९७ मध्‍ये जिहे-कठापूर योजना मंजूर झाली. पाणी आरक्षित झाले; पण पाणी यायला मात्र २०२४ वर्ष उजडावे लागले. दुष्काळी कालावधीत आंधळी तसेच येरळवाडीत हे पाणी येणे, आंधळीत आलेले पाणी माण नदीत सोडणे आवश्यक होते. दुर्दैवाने हे पाणी माण नदीत सोडले नाही.

”२०१९ च्या निवडणुकीवेळी बिजवडी येथे आमदारांनी सहा महिन्यांत पाणी इकडे आले नाही, तर राजीनामा देईन, असे जाहीरपणी म्हंटले होते. सहा महिन्यांत सोडा, पाच वर्षांत ते पाणी आलं नाही आणि आता ते पाणी पुढच्या पाच वर्षांत या भागात फिरेल, हे सांगत आहेत. पंधरा वर्षे झोपलेल्या अवस्थेत असलेल्यांनी पंधरा वर्षांत जिहे-कठापूरचे पाणी माण नदीत का सोडले नाही? आता ते पाणी हिंगणीपर्यंत कधी येणार? वितरण व्यवस्था कशी होणार आहे? असा सवाल देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.

खासदारांना त्‍यांच्‍या दौऱ्या दरम्‍यान शेतकऱ्यांनी ज्या अडचणी सांगितल्या, त्या सोडविण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. सूचना केल्या. खासदारांनी दोन महिन्यांत जे काम केलेय, त्याबद्दल राजकारणापलीकडे जाऊन त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.” असे देखील यावेळी देशमुख यांनी म्हटले.