सातारा जिल्ह्यातील 1,920 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणचा ग्राहकांना कारवाईचा ‘शॉक’

0
114
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील अशा १ हजार ९२० ग्राहकांचा वीजपुरवठा खंड़ित करुन महावितरणने संबंधितांना कारवाईचा ‘शॉक’ दिला आहे.

पुणे प्रादेशिक विभागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सद्यस्थितीत पुणे जिल्हा १९९ कोटी ९९ लाख रुपये, सातारा २० कोटी ४० लाख रुपये, सोलापूर ४४ कोटी ७ लाख रुपये, कोल्हापूर २० कोटी ८० लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १ हजार ९२० थकबाकीदारांचा समावेश आहे.

यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठाखंडित केलेल्या तपासणीचे वीज जोडण्यांच्या काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरू आहे. यामध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारां विरुद्ध महावितरण विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. थकबाकीदारांनी थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.