कराड प्रतिनिधी । कराड शहरात सध्या ठिकठिकाणी खड्डे दिसत आहेत. कोल्हापूर नाक्यापासून शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या कामामुळे पडलेले खड्डे, भेदा चौक, कराड ते मलकापूर मार्गावरील खड्डे तसेच शहरातील अंतर्गत भागात चरीसह पडलेले खड्डे. या खड्डयांमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. मात्र, रस्त्यावर एखादा खड्डा पडल्याचे दिसल्यास त्याचा फोटो काढून शासनाकडे (नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग) पाठवल्यास संबंधित तक्रारदाराची ७२ तासांत दखल घेतली जात आहे. राज्य शासनाच्या ‘पीसीआरएस’ ॲपवर फोटो टाकल्यानंतर खड्याची दुरुस्ती होईल, असा दावा गेल्या वर्षी राज्य शासनाने केला आहे. मात्र, हे अॅप प्रायोगित तत्वावर सुरू असून देखील नागरिकांना याची कल्पना देखील नाही. त्यामुळे कराड शहर व परिसराबरोबरच तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचा प्रश्न अजूनही जैसे थे आहे.
खड्डेमुक्त रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पीसीआरएस अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर नागरिकांना आपल्या भागातील रस्त्यांची स्थिती व खड्यांबाबतची तक्रार ऑनलाइन नोंदविता येते. या तक्रारीची दखल घेत ७२ तासांत खड्याची डागडुजी केली जाईल, असे सांगण्यात आले होते.
कराड शहरात खड्यांची होतेय तत्काळ डागडुजी पण…
कराड शहरात तसे पाहिले तर काही ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर खड्डे आहेत. शिवाय त्याची वर्षातून एकदा डागडुजी ही केली जाते. मात्र, पावसाळ्यात शहरात खड्डे दिसू लागल्यास त्याच्या तक्रारी देखील नागरिकांकडून पालिकेकडे केल्या जात आहेत. शिवाय पालिकेकडून देखील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करून मलमपट्टी केली जात आहे. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा तो खड्डा जैसे थे असा होतो.
काय आहे PCRS App?
पीसीआरएस हे मोबाइल अॅप बांधकाम विभागाने गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. मात्र, सध्या याचा वापर प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. अॅपच्या माध्यमातून नागरिक बांधकाम विभागाच्या आखत्यारितील रस्त्यांवर असलेल्या खड्यांची तक्रार करू शकतील. अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला मोबाइल क्रमांक, ओटीपी, नाव, पत्ता, ई-मेल आयडी जिल्हा व तालुका अशी माहिती नमूद करावी लागेल. यानंतर हे अॅप सुरू होईल, हे अॅप सुरू केल्यानंतर नागरिकांना आपली तक्रार नोंदविता येऊ शकते.
उपयोग कधी?
राज्य शासनाने सुरू केलेले अॅप अजून प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. हे अॅप नागरिकांना लाभदायी ठरु शकते. खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे शासनाने ते नागरिकांसाठी लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.