साताऱ्यात पोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावा उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ‌‌केंद्र शासनाच्या पोषण अभियान अंतर्गत पोषण माह दि. 1 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे पोषण विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व वेगवेगळे उपक्रम घेऊन पोषणाची लोक चळवळ (जन आंदोलन) उभे करण्याकरिता अतिशय उत्साहात राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोषण अभियानांतर्गत साताऱ्यात नुकताच पोषण मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याचे उद्घाटन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरीच्या अधिकारी ज्योती लंगुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे, अंगणवाडी पर्यवेक्षिका हेमलता मोरे, विद्या आगवणे, मनीषा गुरव, रेखा घोरपडे, नलिनी पाटील तसेच बाल विकास सातारा नागरी पश्चिम प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

या पोषण मेळाव्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषण मंगळागौर, पोषण भारुड, पोषण नाटिका, बेटी बचाव बेटी पढाव व स्त्रीभ्रूण हत्या यावरील नाटिका, पोषण कविता व पोषण गीते सादर केली. या पोषण मेळाव्यासाठी सातारा, मेढा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद आणि फलटण या शहरातील 350 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी पर्यवेक्षिका हेमलता मोरे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका विद्या आगवणे यांनी मानले.