सातारा प्रतिनिधी । शहरांमध्ये पाणी साठवून राहावे व सौंदर्यात भर पडावी यासाठी छोटीछोटी तळी तयार करण्यात आली आहेत. काही ऐतिहासिक अशी तळीही सातारा शहरात आहेत. यामध्ये मंगळवार तळे, रिसालदार तळे, फुटके तळे, महादरे तळे, फरासखाना तळे आदी आहेत. यात एका अलंकाराचे नाव असलेल्या मोती तळल्याची सध्या दुरावस्था झाली आहे.
सातारा शहरातील ऐतिहासिक अशा अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या कोंडाळ्यात अडकलेल्या मोती तळ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, या तळ्याच्या विकासासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. या तळ्याचे संवर्धन न झाल्यास हा ऐतिहासिक ठेवा काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती इतिहासप्रेमी सातारकर व्यक्त करीत आहेत.
ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या तळ्यात पूर्वी गणेशमुर्ती विसर्जन केले जायचे. मात्र तळ्यातील पाणी दूषित होऊ लागल्याने काही पर्यावरणप्रेमींनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने तळ्यात मूर्ती विसर्जनास बंदी घालण्याचे आदेश पालिकेला दिले. गेली सहा-सात वर्षापासून या तळ्यातील मूर्ती विसर्जन बंद असून, पालिकेने या तळ्याभोवती तारेचे कुंपन लावून ते बंदिस्त केले आहे. मात्र, देखभाल- दुरुस्तीअभावी या वास्तूची दुरावस्था होत चालली आहे.
या तळ्याचा ऐतिहासिक वारसास्थळात समाविष्ठ झाल्याने प्रशासनाला सुशोभीकरणावर अनेक मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून, संबंधित विभागाची परवानगी घेऊन तळ्याचा विकास साधण्याची मागणी देखील होत आहे.
यापूर्वी देखील केले होते तळ्याचे सुशोभीकरण
खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान जलमंदिर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निवासस्थान असलेले सुरुची या दोन्ही निवासस्थानाच्या मार्गावर बरोबर मधोमध मोती तळे आहे. उदयनराजे भोसले यांचे समर्थक माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढाकार घेऊन मंगळवार तळ्याचे एकहाती सुशोभीकरण केले. पाण्यामध्ये वॉटर फाउंटन तळ्याला चारी बाजूने तारेचे कंपाउंड हँगिंग गार्डन विद्युत रोषणाई अशी व्यवस्था करून त्या तळ्याचे सौंदर्य वाढवले. त्यापूर्वी माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनीही तळे स्वच्छ करम्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, सध्या मोती तळ्याच्या रक्षणासाठी पुढाकार घेणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असा आहे इतिहास
साताऱ्यात प्रतापसिंह महाराज यांच्यानंतर गादीवर आलेल्या अप्पासाहेबांनी जुन्या पालिकेनजीक पाण्याची सोय म्हणून तळे बांधले. रेशीम धुण्यासाठी व्यावसायिक या ठिकाणी येत. या तळ्यातील पाण्यामुळे रेश्माला मोत्यासारखी चकाकी यायची. त्यावरून या तळ्याला ‘मोती तळे’ नाव पडले असावे, असे सांगितले जाते.