कराड प्रतिनिधी | मतदान यंत्रात बिघाड होवून मतदान प्रक्रिया थांबल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील. परंतु, लोकसभा निवडणुकीत एका वेगळ्याच कारणाने तासभर मतदान प्रक्रिया थांबल्याने अनेक मतदारांना भर l दुपारी ताटकळावे लागले. ताटकळून काही मतदार मतदान न करताच घरी गेले. काल मंगळवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास पाटण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या कराड तालुक्यातील सुपने गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
यंदा उन्हाळा कडक आहे. उन्हामुळे मतदार घराबाहेर पडायला तयार नाहीत. त्यातूनही पाटण विधानसभा मतदार संघातील सुपने या गावात तरूणांनी कुटुंबातील मतदारांना केंद्रावर आणले होते. मात्र, मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे मतदारांना ताटकळावे लागले. काही वयस्कर मतदार मतदान न करताच घरी निघून गेले. कोणतीही तांत्रिक अडचण नसताना जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी सुट्टी केल्यानं मतदान प्रक्रिया थांबल्याचं धक्कादायक कारण समोर आल्याने धनाजी पाटील या ग्रामस्थाने प्रांत, तहसीलदारांना फोन केले. तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
तहसीलदारांशी संपर्क साधन धनाजी पाटील यांनी घटनेची माहिती दिली. त्यांनी तलाठ्याला खात्री करण्यास सांगितलं. मात्र, खात्री करण्याऐवजी तलाठ्याने आपल्यालाच द्मात घेतल्याचा आरोप धनाजी पाटील यांनी केला. तसेच मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री करा आणि दोषी आढळणाऱ्ऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या संदर्भात झोनल अधिकारी चंद्रकांत कोळी यांच्याशी संपर्क साधला असता कोळी म्हणाले की, तसं काही झालं असेल तर आपण मतदारांना थोड़ा आणखी वेळ देवू. पण, विषय सोडून द्या. नंतर महिला मंडल अधिकारी थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असा प्रकार होणं शक्य नाही. मतदान कर्मचारी नव्हे तर अंगणवाडी कर्मचारी जेवायला बसले होते, अशी सारवासारव त्यांनी केली.