सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विशिष्ट मतदान केंद्र काही घटकांना मध्यवर्ती ठेवून उभारली जाणार आहेत. या घटकांमध्ये दिव्यांग, महिला, जवान, किसान आणि तरुण यांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अशी विशिष्ट मतदान केंद्रे उभी राहणार आहेत. त्यापैकी महिला मतदान केंद्राचे नाव सखी असे देण्यात आले आहे. 232 कोरेगाव आणि 85 खिंडवाडी ही दोन केंद्रे सखी मतदान केंद्रे असणार आहेत.
निवडणूक विभागाच्या वतीने दिव्यांग थीमवर आधारित 156 त्रिपुटी हे केंद्र असणार आहे. 55 देऊर आणि 78 संगम माहूली ही दोन मतदान केंद्रे युवा थीम नुसार उभारली जाणार आहेत. जवान या थीमनुसार 185 तांदुळवाडी आणि जय किसान वाघ्या घेवडा या थीम नुसार कोरेगावमध्ये केंद्र उभारले जाणार आहे.
विशिष्ट घटकांना न्याय देण्यासाठी, हे घटक प्रामुख्याने समाजासमोर येण्यासाठी मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून व्यवस्थित नियोजन करून आणि कल्पकतेप्रमाणे ही केंद्रे उभारली जाणार आहेत. ही केंद्रे या विशिष्ट थीमनुसार आहेत हे स्पष्टपणे जाणवण्यासाठी खबरदारी घेण्यात येत असून या केंद्रांवर संबंधित थीम नुसार आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. महिला, जवान, किसान ,दिव्यांग या घटकांना उभारी देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ही मतदान केंद्रे उभारली जात आहेत, अशी माहिती कोरेगाव प्रशासनाकडून देण्यात आली.