सातारा प्रतिनिधी | वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी नियम पाळून उत्सव साजरा करावा. डॉल्बी आणि लेझर लाइटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढणार्या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिला.
वाई पोलीस ठाण्याच्या आवारात नुकतीच गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक मंडळाची पोलिसांकडे नोंद होणे गरजेची आहे. त्यासाठी सहकार्य केले जाईल. समाजाच्या भावना दुखावतील अशी वर्तणूक, देखावे करू नयेत. वीज कनेक्शनसाठी महावितरणची परवानगी आवश्यक आहे. प्रत्येक मंडळास वेळेचे, आवाजाचे बंधन राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, सामाजिक उपक्रम राबवावेत.
काही ग्रामपंचायतींनी डॉल्बीवर बहिष्कार घातला आहे. त्यांचे अनुकरण करावे. गुन्हेगारी प्रवृत्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. इतर आवश्यक परवानग्यांनंतरच पोलिसांकडून परवानगी देण्यात येईल. पोलिसांकडून घेण्यात येणार्या गणेशोत्सव स्पर्धेत तीन मंडळांना पारितोषिके देण्यात येतील, असे भालचिम यांनी सांगितले. दरम्यान, जिवंत देखाव्यांसाठी वेळ वाढवून मिळावी. मिरवणुकीदिवशी रस्त्यावरील बंद वाहने काढावीत, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली.