सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील बावधन येथील एका सराईताकडून वाई पोलिसांनी एक बारा बोअर बंदूक, सहा जिवंत काडतुसे, पिस्तूल लायटर व दोन चारचाकी वाहने असा एकूण आठ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अविनाश मोहन पिसाळ असे संशयिताचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
रविवारी (ता. १८) वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत बावधन येथील सराईत संशयित अविनाश पिसाळ याच्या राहत्या घरासमोर उभ्या असणाऱ्या दोन चारचाकी वाहनांमध्ये शस्त्रास्त्रे असल्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी उपनिरीक्षक बिपिन चव्हाण व पोलिस अंमलदारांना संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार अविनाश पिसाळ याच्या घराबाहेर सापळा रचून त्याच्या घरासमोरच्या दोन चारचाकी वाहनांची झडती घेतली. त्यावेळी वाहनांमध्ये सहा बारा बोअरचे जिवंत काडतुसे तसेच घरातून एक बारा बोअर रायफल व एक पिस्तूलसदृश लायटर मिळून आले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री. शहाणे, उपनिरीक्षक बिपिन चव्हाण, हवालदार मदन वरखडे, नाईक श्रीनिवास बिराजदार, कॉन्स्टेबल श्री. जाधव, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के, श्री. सुतार, होमगार्ड श्री. गोफणे यांच्या पथकाने केली. या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी वाई पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे.