बोरगावात साडेचार किलो गांजा जप्त, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील बोरगावमधील बोरजाई मंदिरासमोर अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १,११,००० रुपये किंमतीचा साडे चार किलो गांजा, मोटारसायकल आणि मोबाईल जप्त केला.

जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजा विक्री, लागवड व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथक तयार करुन त्यांना अंमली पदार्थांची लागवड, विक्री, वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढण्याची सूचित केले होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टीव्हीएस मोटर सायकलवरून (क्र. एम. एच. ११ डी. क्यू. ०२६३) एकजण पुणे बेंगलोर महामार्गावरील बोरगावच्या बोरजाई मंदीरासमोर गांजा विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती खबऱ्याने एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली. त्यांनी उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना कारवाईचे आदेश दिले. बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे आणि अंमलदारांच्या मदतीने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयिताकडून १,११,००० रुपये किंमतीचा साडे चार किलो गांजा, १,३०,००० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल व १०,००० रूपयांचा मोबाईल, असा एकूण २,५१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्या विरुध्द बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.