सातारा प्रतिनिधी । शाहूपुरी पोलिसांच्यावतीने तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकत सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मार्केट संकुल परिसर, राजधानी टॉवर परिसर आणि करंजेतील श्रीपतराव शाळा परिसर या तीन ठिकाणी पोलिसांनी नुकतीच कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी शहरातील जुना मोटर स्टॅन्ड येथील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मार्केट संकुलाच्या शेजारी सादिक आयुब सय्यद रा. गुरुवार पेठ, परज, सातारा आणि चंद्रमणी आगाणे (रा. गोडोली, सातारा) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून १ हजार ५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत राजधानी टॉवरच्या आडोशाला मधुकर उर्फ सागर जयसिंग भोसले रा. केसरकर पेठ सातारा, विनायक पांडुरंग महाडिक (रा. ढोणे कॉलनी, सातारा) तसेच चंद्रकांत चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याकडून १३०५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तिसऱ्या घटनेत करंजेतील श्रीपतराव शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अस्लम खतीब शेख रा. करंजे सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून ६४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.