मलकापुरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत पोलीसांचा छापा; बेकायदेशीररीत्या वाहनामध्ये गॅस भरताना एकास रंगेहाथ पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड नजीक असलेल्या मलकापुरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत वाहनामध्ये बेकायदेशीररीत्या घरगुती गॅस भरण्याचा प्रयत्न करत असताना छापा टाकला. सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेने केलेल्या कारवाईत एका संशयितास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, बेकायदेशीरपणे मलकापूरमधील आगाशिवनगर परिसरात घरगुती गॅस रिक्षा तसेच अन्य वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेस मिळाली होती. या माहितीवरून पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार साहिला नायकवडे, सागर ठोंबरे, अव्वल कारकून महादेव आष्टेकर, तौफिक मुजावर, गणेश जाधव यांनी आगाशिवनगर परिसरातील इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरात छापा टाकला.

यावेळी एक संशयित युवक वाहनांमध्ये बेकायदा घरगुती गॅस भरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळावरून घरगुती गॅस सिलेंडरसह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी वापरल्या जाणारे साहित्य पुरवठा विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी संशयिताला ताब्यात घेत पुरवठा विभागाच्या निरीक्षक साहिला नायकवडे या आपल्या सहकाऱ्यांचे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.