सातारा जिल्ह्यात 23 लाख रुपये किंमतीची 114 किलो अफूची झाडे जप्त, दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती सासवड (झणझणे) आणि देऊर येथील शेतात अफूची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार देवकर यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने देऊर (ता. कोरेगाव) येथे छापा मारून ४ लाख ६७ हजार रुपये किंमतीची २३ किलो अफूची झाडे जप्त केली.

लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे व उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सासवड-झणझणे (ता. फलटण) येथे छापा टाकला. तसेच संशयिताच्या शेतातून १८ लाख १६ हजार रुपये किंमतीची ९० किलो अफूची झाडे जप्त केली. या दोन्ही घटनेतील संशयितांवर गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे व अफूची या अंमली पदार्थ विरोधी एकूण ११ कारवाया करुन १ कोटी ८७ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ७७५ किलो ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.