वडूजमध्ये सखी-सावित्री समिती अंतर्गत विद्यार्थिनींना पोलीस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

0
3

सातारा प्रतिनिधी । दडपणाखाली वावरत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यातून मुक्ती मिळावी तसेच अशा शाळेतील प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात सखी सावित्री समिती अंतर्गत वडूज पोलिस ठाणे यांच्यावतीने विद्यालयातील विद्यार्थिनींना पोलिस नाईक सचिन जगताप व महिला पोलिस राजश्री खाडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलिस नाईक सचिन जगताप यांनी शाळा सुटल्यानंतर बसस्थानकावर विद्यार्थिनींचे वर्तणूक कसे असावे. एखाद्या व्यक्तीने गैरव्यवहार केल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. तर महिला पोलिस राजश्री खाडे यांनी मुलींना कोणतीही अडचण आली तर संपर्क साधावा. तसेच सर्व मुलींनी आपल्या आई-वडिलांच्या मोबाइलमध्ये पोलिसांचा नंबर सेव्ह करावा, कोणतीही व्यक्ती विनाकारण त्रास अथवा गैरव्यवहार करत असेल तर त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करावी. तसेच पोलिस प्रशासन मुलींच्या रक्षणासाठी चोवीस तास उपलब्ध असेल अशी ग्वाही ही यावेळी दिली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. आर. जाधव, पर्यवेक्षिका बी. एस. माने, पोलिस नाईक सचिन जगताप, महिला पोलीस राजश्री खाडे, पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव, ज्ञानेश्वर टिंगरे, सागर पोळ, सुप्रिया फडतरे, एन. एस. धुमाळ यांच्यासह महिला शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.