कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने जिल्ह्यातील सातारा, कराड व फलटण येथे बनावट दारु तयार करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत एकूण रुपये 7 लाख 36 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. तसेच 4 जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 09 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खुशाल बाळासो गोफणे (रा. सोनगाव, ता. बारामती, जि. पुणे), भूषण बाळासो मुटेकर (रा. माळेगांव ता. बारामती, जि. पुणे), गणेश मल्हारी चव्हाण (रा. ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे) आणि इसाक हुसेन शेख (रा. कार्वेनाका कराड, ता. कराड जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संबधितां विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील सातारा शहर, फलटण तसेच कराड तालुक्यात बनावट दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या आधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी संबंधित माहिती तिन्ही तालुक्यातील आपल्या विभागाच्या पथकास देत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज दिवसभरात तिन्ही तालुक्यात ठिकठिकाणी संबंधित पथकाकडून आरफळ (ता. जि. सातारा) गावचे हद्दीत साताराकडून लोणंदच्या दिशेने जाणारी बेकायदेशीर मद्याकांची (स्पिरीट) वाहतूक पकडली.
तसेच दुसऱ्या पथकाने ढाकाळे (ता. बारामती जि. पुणे) व भावेनगर- पिपाँडे (ता. कोरेगांव, जि. सातारा) येथे छापा टाकून बेकायदा बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे 1 हजार 500 लिटर स्पिरीट (मद्यार्क), 90 बाटल्या बनावट देशीदारू, कॅप सिलींग मशीन, 2 चारचाकी वाहने, 3 मोबाईल संच तसेच बनावट देशीदारू तयार करण्याकरिता लागणारे इतर साहित्य असा एकूण रुपये 7 लाख 36 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मुंबई संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सातारा अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक माधव चव्हाण, संजय साळवे, महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, नितीन जाधव यांनी सहभाग घेतला.