सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिस मुख्यालयात एक खळबळजनक प्रकार घडला असून मुख्यालयातील राखीव पोलिस उपनिरीक्षक कार्यालयात निरीक्षकालाच धमकी देत टेबल ढकलून खुर्चीला धक्का देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राखीव पोलिस निरीक्षक जयसिंग जाधव यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार महेश अशोक शिवदास, दादासाहेब राजेशिर्के आणि एक अनोळखी (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. १७ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
फिर्यादी हे कार्यालयात दैनंदिन काम करत असताना संशयितांनी “तुला बघून घेतो, पेन्शन खाऊ देत नाही. मी तुझ्याविरोधात उपोषणाला बसतो,” अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी जाधव यांचा टेबल ढकलून तसेच खुर्चीला धक्का देत दमदाटी केली. त्यानंतर जयसिंग जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. हवालदार घोडके हे तपास करीत आहेत.