सातारा प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कास पठार परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला नाचवण्यात आल्या. यावरून वाई तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी कोणत्याही नृत्यांगना बारबाला यांना मनोरंजन करण्यासाठी बोलावून पार्टीचे तसेच आयोजन करू नये. पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे अन्यथा हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट, बार, रिसॉर्ट, फार्म हाऊस, चायनीज सेंटर, पान टपरी यांचे लायसन रद्द करू, असा खणखणीत इशारा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.
साताऱ्यातील कास पठार भागात वर्ष अखेरीस म्हणजे ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात पार्टींचं आयोजन केलं जातं. या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कास पठारातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार रिसॉर्ट, फार्म हाऊस ,चायनीज सेंटर, पान टपरी चालक-मालक यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यात पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कास पठार परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टी झाली. या रेव्ह पार्टीत बारबाला नाचवण्यात आल्या. या पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या रेव्ह पार्टीनंतर या ठिकाणी वाद होऊन राडा झाला होता. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले होते.
या प्रकरानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात कोणत्याही पोलिस बंदोबस्तात ही रेव्हपार्टी झाली नसल्याचे सांगत या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले होते.