विधवा आई अन् 16 वर्षाच्या लेकीला फरफटत नेत केली मारहाण; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षातून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात असताना सातारा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना रविवारी घडली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द गावात मायलेकीला संपूर्ण गावासमोर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघींचे कपडेही फाटले. याबाबतची तक्रार पीडितेने पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्हा हादरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथे दोन शाळकरी मुलांमध्ये सुरुवातीला किरकोळ कारनावारून भांडणे झाली. या भांडणाच्या रागातून एका कुटुंबातील सदस्यांकडून मायलेकींना त्यांचे वस्त्र फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडल्यानंतर पीडित महिला आणि अल्पवयीन मुलीने रात्री पोलीस ठाणे गाठले तसेच घडलेलया प्रकारची माहिती दिली.

सोमवारी सकाळी पीडित महिलेच्या तक्रारीवरून, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कलमन्वये मारहाण करणाऱ्यांविरोधात कलम ३५४, ३५४(अ), ३२३, ३(१)(आर)(एस), ३(१)(डब्ल्यु)(१), ३(२)(व्ही.ए.) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील पीडित महिला आणि आरोपी हे दोघेही आपापल्या कुटुंबासह कुरवली खुर्द (ता. फलटण) या गावात राहत आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बागर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.