कराड प्रतिनिधी | बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या (शनिवारी) महाराष्ट्र बंद पुकारलाय. बंद काळात तणावाची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस दल सज्ज झालं आहे कराडमध्ये पोलिसांची अचानक कुमक दाखल झाली आणि भर चौकात अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यानं नागरीकांची मोठी पळापळ झाली. दंगा काबू पथक मेन रोडने सरसावलं आणि कराडकरांच्या काळजात धस्सं झालं. नेमकं काय झालंय, हे क्षणभर नागरीकांना कळलं नाही. सुसज्ज पोलिसांना पाहून नागरीक काळजीत पडले.
कराड शहरात दंगा काबू पथकाचं मॉकडील
दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने कराड पोलिसांनी मॉकड्रील केलं. दंगल नियंत्रणाच्या प्रात्यक्षिकामुळं कराड शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र, कोणतीही अनुचित घटना घडली नसून पोलिसांनी दंगल नियंत्रणाचं प्रात्यक्षिक केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदेबस्त
महाविकास आघाडीच्यावतीनं उद्या (शनिवारी) महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सातारा जिल्ह्यात चोख बंदोबस्ताची तयारी करण्यात आलीय. दंगा काबू पथक, सशस्त्र पोलीस, होमगार्डना बंदोबस्तावर तैनात करण्यात येणार आहेत. कराडमध्ये शुक्रवारी सायंकाळी डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत मॉकड्रील आणि संचलन करण्यात आलं.