कराडात रात्री बारानंतर साऊंड सिस्टिम लावण्यावरुन पोलिस-मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | काल मंगळवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, गणेश मूर्ती विसर्जना दरम्यान कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री बारा वाजल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पोलिसांनी साऊंड सिस्टिम, वाद्य वाजवण्यास बंदी केली असता एका गणेश मंडळांने रात्री बारानंतर एक तर गाणी वाजू द्या या मागणीवरून चावडी चौकातच काही काळ ठिय्या मारला. त्या दरम्यान कराडचे पोलीस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांनी संबंधित मंडळास पुढे जाण्यास सांगितले. मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते न ऐकल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना चावडी चौकातून कृष्णा नदीपात्राकडे जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कराड येथील कृष्णा नदीकाठी मंगळवारी सकाळी दहानंतर गणपती विसर्जनास सुरुवात झाली. कराडमधील मुख्य चावडी चौकातून कृष्णा नदी पात्राकडे जाणाऱ्या जाणाऱ्या मुख्य मार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. यावेळी विविध मंडळांकडून झांजपथक, पारंपरिक वाद्य यांना पसंती दिल्याचे दिसून आले.

रात्री बारानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, स्पीकर लावण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री बारानंतर आलेल्या गणेश मंडळांना स्पीकर व वाद्य वाजवणे बंद करावे, असे आवाहन केले. कराड मधील चावडी चौकात एका गणेश मंडळाने आम्हाला बारानंतर एक तरी गाणे वाजू द्या, असा हट्ट धरून काही काळ तेथे ठिय्या मारला. दरम्यान कराडचे पोलीस उपाधिक्षक ठाकूर यांनी रात्री बारा वाजल्यानंतर एकही गाणं वाजवता येणार नाही पुढे चला, असे आवाहन मंडळाला केले. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांचे न ऐकल्याने पोलिसांनी बळाचा वापर करन त्यांना कृष्णा नदीपात्राकडे जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही काळ चावडी चौकात तणाव निर्माण झाला होता. मात्र, काही कालावधीनंतर तो तणाव निवळला आणि पूर्ववत विसर्जन सुरू झाले.