सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेकांना गंडा घालणाऱ्या व पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून लुटणाऱ्या विष्णू पांडुरंग दळवी (रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला बेड्या ठोकण्यात आल्या. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून कराड येथील पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे.
विष्णू दळवी याने डोलो इन्फ्रास्ट्रक्चर, कालकम रिअल इस्टेट, डीएसपी गोल्ड एल.एल.पी, ग्रीनटच क्लीअर, एझो रेसौर्सेस, धनश्री मायनिंग, लँन्डमार्क मायनिंग, प्रगती लोजिस्टिकस कंपन्या तयार केल्या आहेत. या कंपन्यांच्या मार्फत महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील हजारो लोकांकडून त्याने गुंतवणूक करा त्या बदल्यात चांगला परतावा देवू, असे सांगितले. अशाप्रकारे सुमारे २०० कोटी रुपयांचा चीटफंड घोटाळा केलेला आहे.
विष्णू दळवी याच्या विरोधात महाराष्ट्र राज्यामध्ये १० पेक्षा जास्त एफआयआर दाखल आहेत. यामध्ये सोलापूर, नाशिक, सातारा, रबाळे, यवतमाळ, पुणे, चिपळूण, नागपूर व चंद्रपूर याठिकाणी त्याच्यावर सह एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. साताऱ्यातील कराड येथील दाखल गुन्ह्यात सुमारे ७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सातारा करत आहे. संशयित विष्णू दळवी हा उच्च न्यायालयात अनेकदा जामीनासाठी गेला. काही गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, सर्वच गुन्ह्यात जामीन मिळालेला नाही.
पोलिस दळवीचा शोध घेत असताना ठाणे पोलिसांना त्यात यश आले. ठाणे पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता दळवी याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.