सातारा प्रतिनिधी | सांबराच्या शिंगांची विक्री व तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना एलसीबी पथकाने सापळा रचून पकडले. पुणे-बंगळुरू महामार्गावर पेरले (ता. कराड) हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन आत्माराम जाधव आणि अमोल सुरेश गायकवाड (दोघेही रा. गोसावीवाडी, ता. कराड), अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई
पेरले गावच्या हद्दीतील पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दोन इसम सांबर प्राण्याच्या शिंगाची तस्करी व विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अरुण देवकर यांना खास खबऱ्याकडून मौजे मिळाली. त्यांनी आपल्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी वेशांतर करून संशयितांना पकडले
एलसीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी वेशांतर करुन पेरले गावच्या हद्दीत सापळा रचला. यावेळी संशयितरित्या वावरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडील पांढरे रंगाच्या पोत्यामध्ये सांबर या वन्य प्राण्याची दोन मोठी शिंगे आढळून आली. सांबराच्या शिंगे आणि तस्करीसाठी वापरलेल्या मोटार सायकलींसह ५ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दोन्ही संशयितांवर उंब्रज पोलीस ठाण्यात वन्य प्राणी अधिनियम १९७२ च्या कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रोहित फार्णे, उप निरिक्षक विश्वास शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुधीर बनकर, हवालदार साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, लक्ष्मण जगधणे, सनी आवटे, मनोज जाधव, मुनीर मुल्ला, राजु कांबळे, अमोल माने, अमित झेंडे, अमृत कर्पे, शिवाजी भिसे, कॉन्स्टेबल केतन शिंदे, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, मोहसीन मोमीन, स्वप्निल दौंड यांनी ही कारवाई केली आहे.