सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी घरांपासून ते एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून केला जात आहे. दरम्यान, दहिवडी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम फोडून त्यातील पन्नास लाखांपेक्षा जास्त रक्कम चोरण्याच्या प्रयत्न सुरू होता. याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पळून जाणाऱ्या चोरांना पोलिसांनी चार किलोमीटर पाठलाग करून पकडले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.
सागर जगन्नाथ गाडे (वय २३, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण), रणजीत राजेंद्र ओंबासे (१८, रा. वडगाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या चेन्नई येथील कार्यालय आणि माळशिरस येथून फोनद्वारे दहिवडी शहरातील एटीएम केंद्रात काही चोर घुसले असून ते एटीएम फोडत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असता एटीएम फोडल्याचे दिसले. तसेच कॅमेऱ्याचेही नुकसान झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास केला असता एटीएममधील छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपींचा शोध सुरू केला.
या तपासादरम्यान एटीएम केंद्राशेजारीच असलेल्या डॉ. पाटील यांच्या हॉस्पिटलजवळ अंधारात काहीजण हे दुचाकी सुरू करत असतानाचा आवाज आला. त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांच्याकडे विचारपूस करण्याकरिता जात असताना गाडीच्या मागे बसलेल्या संशयित चोरट्याने पळ काढत असताना गटार नाल्यामध्ये उडी मारली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांसह त्याचा पाठलाग सुरू केला. उरलेल्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर बसलेल्याला पकडले. पळून गेलेला पिंगळी बाजूकडून साताऱ्याकडे पळून जात असताना अंधाराचा फायदा घेऊन टेकडीवर लपून बसलेला होता.
त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त झाल्याने त्याबाबत तत्काळ सायबर यंत्रणा सातारा यांच्याकडून त्याच्या मोबाइलचे लोकेशन मिळवून त्याला पकडले. हा गुन्हा दहिवडी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत उघडकीस आणला असून कामगिरी यशस्वी करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवने, बापू खांडेकर, तानाजी काळेल, सचिन वावरे, स्वप्निल म्हामणे, नीलम रासकर, गणेश खाडे, विलास हांगे यांनी परिश्रम घेतले.