सातारा प्रतिनिधी | हाॅटेलमधून रात्री जेवण करुन घरी जाणाऱ्या तरुणाचे अपहरण करुन त्याच्याकडील मोबाईलसह ७५ हजारे लुटल्याची घटना साताऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईलसह ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
विनीत संजय कदम (वय २१, रा. झेंडा चाैक नवीन औद्योगिक वसाहत सातारा), मनोहर विठ्ठल भोसले (वय २३, रा. कारंडवाडी बसथांब्याशेजारी, सातारा) आणि धीरज धर्मेंद्र बोधे (वय १९, रा. सोनवडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ११ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास एक तरुण साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीतील एका हाॅटेलमध्ये जेवण करुन घरी निघाला होता. त्यावेळी अनोळखी तिघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्याला जानाई मळाई डोंगराच्या पायश्याला नेले. त्या ठिकाणी अंधारात त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने घेतला व पळून गेले. त्यानंतर तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस उप अधीक्षक राजीव नवले यांनी शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली. त्यानंतर निरीक्षक म्हस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करुन लुटारुंचा शोध घेण्याची सूचना केली. त्यावेळी संशयित हे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर त्यांना कारंडवाडी, सोनवडी परिसरातून ताब्यात घेतले. सदर कारवाई पोलिस निरीक्षक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, गोसावी, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम, अजित माने तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.