सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील मंदीरातील देवांच्या मुर्ती चोरणारी टोळी सुपे (ता.बारामती) येथील पोलीसांनी मोठ्या शिताफीने, सिनेमा स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतली. यामध्ये एका अल्पवयीनचा समावेश आहे.
टोळीकडून सुमारे १०७ वर्षापूर्वीची पुरातन धातूची पानेश्वराची मुर्ती, देवीचा मुखवटा, १५ घंटा, मुकूट, समई, पंचार्ती, मंदीरातील अन्य धातूच्या वस्तू असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी आरोपी ओंमकार शशिकांत सांळुखे (राहणार आनंदपुर, ता.वाई, जि.सातारा. सध्या राहणार शिरवळ, पंढरपुर फाटा, ता.खंडाळा, जि.सातारा), तुषार अनिल पवार (राहणार दत्तनगर, सांगवी रोड, ता.खंडाळा, जि.सातारा), सौरभ दत्तात्रय पाटणे (राहणार शिरवळ, ता. खंडाळा, जि.सातारा) व एक अल्पवयीन तरूणाला ताब्यात घेतले आहे.
पुणे व सातारा जिल्ह्यातील मंदीरामध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. लोकांच्या भावनेचा व श्रद्धेचा विषय असल्याने या चोरीचा तपास करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
सुपे पोलिस ठाण्याचे पोलीस रात्रगस्तीवर असताना ही टोळी सापडली. या आरोपींवर सुपे, भोर, वेल्हा, सातारा, वाठार, हडपसर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. वाई, राजगड, लोणंद, सातारा, जेजुरी व अन्य ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे.
सहायक पोलीस निरिक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस कॉन्सेबल सचिन दरेकर, सागर वाघमोडे हे रात्रगस्तीवर असताना दंडवाडी (ता.बारामती) गावच्या परिसरात एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो ८०० गाडी क्र.एमएच १२ सीडी ६७५७ रस्त्याच्या कडेला नंबरप्लेटवर चिखल लावलेल्या स्थितीत उभी होती.
संशय आल्याने रात्रगस्त पोलीस गाडीजवळ जाताच गाडीतील इसमाने सदरची गाडी वेगात सुपे बाजुकडे नेली. त्याच वेळी शेजारीच असलेल्या विठठ्ल मंदिरातील दोन अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेऊन पळाले. ते तात्काळ पोलीस पथकासह सदर ठिकाणी आले. कार घेवुन पळालेल्या इसमाचा पाठलाग करुन त्यास लोणंद (जि.सातारा) येथून ताब्यात घेतले. तसेच, अंधाराचा फायदा घेवून पळालेल्या दोघांना देखील शिताफीने ताब्यात घेतले.