सातारा प्रतिनिधी | नरवणे (ता. माण) येथे तरुणाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात गुरुवारी आणखी दोघांना अटक केली आहे. यामुळे आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे.
सलमान ऊर्फ गुड्डु बाबुलाल मलबारी (वय 20, रा. बारामती जि. पुणे) व रोनक अजय पंजाबी (वय 21, दोघेही रा. बारामती, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 18 मार्च रोजी योगेश सुरेश पवार या युवकाला संशयित रोशनी विठ्ठल माने हिने मला तुला भेटायचे आहे तसेच आम्ही हात उसने घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत, असे सांगून बोलावून घेतले. यावेळी रोशनी, तिची आई पार्वती व अन्य पाच जणांनी योगेशचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये टाकून कालव्यात फेकून दिला होता.
याप्रकरणी गुन्हा केल्यानंतर पोलिसांनी रोशनी व पार्वती या दोघींना मुंबईतून अटक केली. त्यानंतर सागर माने व दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. तर यातील आणखी दोन पसार असलेल्या संशयितांचा शोध सुरू होता. संशयित सलमान व रोनक हे भोसरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी संशयितांना अटक केली. सपोनि रवींद्र खाडे, तनुजा खाडे, अजिनाथ नरबट, गणेश खाडे, अर्जुन खाडे यांच्यासह कर्मचार्यांनी कारवाईत सहभाग घेतला.