पाचगणीसह महाबळेश्वरमधील ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर पोलीस प्रशासनाचा वॉच

0
2

सातारा प्रतिनिधी । नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी, महाबळेश्वर पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. या दोन्हीही स्थळांवरची सर्व हॉटेलसह पर्यटक निवासस्थानांची आगाऊ नोंदणी पूर्ण झाली असून, त्यांच्याकडून नववर्ष स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी संगीतासह पर्यटकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान, नववर्षाचे स्वागत करतेवेळी अनैतिक कृत्य, अमली पदार्थांचा वापर, ध्वनिप्रदूषण आदीबाबत पोलिसांकडून सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दोन्ही पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते, तसेच परिसरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे. तसेच हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी आणि ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवायांसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षण असलेल्या वेण्णा लेक परिसरात नौकाविहारासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. वेण्णा लेकसह येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळीदेखील पर्यटक दिसत आहेत. थंडी, धुंद आल्हाददायक वातावरण अन् महाबळेश्वरी पदार्थांची चव चाखण्यास पर्यटक सध्या हातगाड्यांपासून मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत. लालचुटूक, आंबटगोड स्ट्रॉबेरीची चव चाखताना, तसेच गाजर-मुळा-गरमागरम मक्याच्या कणसावर ताव मारतानाही पर्यटक पाहावयास मिळत आहेत.

महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत सायंकाळी स्वेटर, मफलर, कानटोपी परिधान करून पर्यटक फेरफटका मारत आहेत. थंड वातावरणात अनेक खवय्ये पर्यटक हे स्ट्रॉबेरी विथ क्रीम, आईसगोळा अशा थंड पदार्थांसोबत गरमागरम मका पॅटिस, स्प्रिंग पोटॅटो, शॉरमासारख्या पदार्थांवरदेखील तुटून पडत आहेत. शालेय सहलींमुळे विद्यार्थ्यांचीदेखील गर्दी पाहावयास मिळत आहे. दिवसभर प्रेक्षणीय स्थळे फिरून सायंकाळी खरेदीसाठी आल्यामुळे बाजारातील रेलचेल वाढली आहे. पाचगणी, महाबळेश्वरमधील हॉटेल, लॉज, रिसॉर्टबरोबर वाई तालुक्यातील फार्म हाऊसला मोठी मागणी आहे. त्यामुळे येथे आत्तापासून आरक्षण व खाद्यपदार्थांची मागणी नोंदविली जात आहे. पर्यटनस्थळाबरोबर वाईचा महागणपती व मांढरदेव काळूबाई येथेही भक्तांची गर्दी या सुटीच्या अनुषंगाने वाढली आहे.

संभाव्य तक्रारींबाबत सावधगिरीच्या सूचना

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार आणि कोयना पाटण ही पर्यटन स्थळे गजबजून गेली आहेत. महाबळेश्वरच्या विविध पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. नववर्षाचे स्वागत करतेवेळी अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामध्ये अनेकदा अनैतिक कृत्य, अमली पदार्थांचा वापर केला जातो. संगीत -गाण्यांचा कार्यक्रम करताना ध्वनिक्षेपक लावत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करत परिसरात अशांतता निर्माण केली जाते. या सर्व संभाव्य तक्रारींबाबत सावधगिरीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पाच पथके तैनात

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पाच पथके नेमण्यात आली आहेत. दारूची दुकाने रात्री साडेदहाऐवजी मध्यरात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्य पिण्यासाठी तात्पुरता परवाना घेणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागाकडे परवानगी मागणी अर्ज आले आहेत.

महाबळेश्वर, कास वन विभागाकडूनही बंदोबस्तात वाढ

नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी येथील बाजारपेठा रोषणाईने सजल्या आहेत. कास पठारावर मोठी गर्दी आहे. अनेक हॉटेल अगोदरच आरक्षित झालेली आहेत. तापोळा, कास पठार, कोयनानगर परिसरात व जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या धरणांच्या क्षेत्रातदेखील पर्यटक येऊ लागले आहेत. जल्लोषी कार्यक्रमामुळे वन्य जीवांना त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यात महाबळेश्वर, कास वन विभागाकडूनही बंदोबस्त वाढवला आहे.