ग्रंथांविषयीचे प्रेम असणारी पिढी निर्माण व्हाव्यात हवी : कवी प्रवीण दवणे

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कागदी फतव्यांनी वाचन संस्कृती वाढणार नाही तर वाचक वाढले पाहिजेत आणि त्यासाठी ग्रंथांविषयीचे प्रेम असणारी पिढी निर्माण व्हायला हवी. ग्रंथ वाचनाचे वातावरण घराघरांतून तयार व्हायला हवे. ग्रंथ वाचन सातवा ऋतू आहे, ज्यामुळे अंतर्मन सुंदर होते. विद्यार्थ्यांनी पालकांकडे पुस्तकांचा आग्रह धरावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखक व कवी प्रवीण दवणे यांनी केले.

सातारा येथील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये 24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी उद्घाटक ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, राज्य शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी दीपक गंबरे, समन्वयक प्रल्हाद पार्टे, सुनीता कदम, डॉ. राजेंद्र माने, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, निवृत्त शिक्षणाधिकारी राजकुमार निकम व संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनीताराजे पवार, वि. ना. लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री. दवणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी रोज वेगवेगळी पुस्तके वाचायला हवीत. त्यासाठी साहित्य वेध घेणारी व तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांची पिढी सक्रिय हवी. अशा शिक्षकांना शिक्षण व्यवस्थेने संवेदनशीलपणे टिपायला हवे.

श्री. राजीव खांडेकर म्हणाले, निकोप समाजरचनेसाठी प्रगल्भ नेतृत्व गुण ग्रंथ वाचनतून जन्माला येतात. पुस्तकी पांडित्याइतकेच जगण्याचे भान देणारे व्यवहार ज्ञान महत्त्वाचे आहे, त्यासाठी उत्तम वाचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथापर्यंत घेऊन जाणे आणि ग्रंथ वाचनाविषयी प्रेम निर्माण करणे ही प्रक्रिया महत्त्वाची असून त्यामधून सुसंस्कृत वाचक घडतो. विद्यार्थ्यांनी आपल्या घरात एक छोटे ग्रंथालय तयार करावे, असे आवाहन त्यांनी केले. संपतराव सूर्यवंशी यांनी शैक्षणिक धोरण स्पष्ट केले. ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात ग्रंथघर हवे आणि ज्ञानाचे लावण्य या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

शाल, कंदी पेढे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सौ. जान्हवी खांडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिरीष चिटणीस यांनी प्रास्तविक केले. सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले. राजकुमार निकम यांनी आभार मानले.