सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार होता. दि. 19 रोजी पंतप्रधान मोदी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यांचा दौरा काही कारणाने पुढे ढकलण्यात आला आहे.
पंतप्रधानपद मोदी हे माण तालुक्यातील आंधळी धरणाचे जलपूजन व साताऱ्यात शिवसन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनी येणार होते. हा दौरा पुढे ढकलल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली माण व सातारा तालुक्यातील तयारी वाया गेली आहे. तसेच भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरझन पडले आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जास्त आतुरता कोणाला लागली होती तर ती खासदार उदयनराजे भोसले यांना होय. त्यांनी तशी तयारी केली होती. शिवाय माढामधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील शड्डू ठोकला होता. येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होणार होता.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या जिहे कटापूर योजनेचे पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणात सोडण्यात आले आहे. या पाण्याचे जलपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 19 फेब्रुवारीला होणार होते. मात्र, त्यांचा दौराच रद्द झाला आहे. तसेच काही कारणास्तव पंतप्रधान मोदी यांचा सातारा व माणचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.