सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्या कास जलवाहिनी वाढीव कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 19 रोजी ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे.
पंतप्रधान सोलापूर दौर्यावर असताना राज्यातील 6-7 प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामध्ये कास धरण जलवाहिनी कामाचाही समावेश आहे. सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून कास धरणाची उंची वाढवल्यामुळे 0.5 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. अतिरिक्त पाण्याचा पूरेपूर वापर व्हावा यासाठी वाढीव क्षमतेच्या जलवाहिन्या बसवण्यात येत आहेत.
या कामाचा शुभारंभ दि. 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सातारा पालिकेच्या सभागृहात होणार्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील आमदार तसेच खासदारांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे यांच्याकडून कामाचे नियोजन करण्यात येत आहे.