पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज जिल्ह्यातील ‘या’ 5 रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांचा शुभारंभ; खा. उदयनराजेंनी मानले आभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्यप्रणाली व्दारे अमृत भारत योजनेतील (Amrit Bharat Yojana) रेल्वेस्टेशनच्या विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे. तसेच कोरेगांव तालुक्यातील वाठार स्टेशन, पिंपोडे, शिरढोण, जरंडेश्वर, आणि कराड तालुक्यातील पार्ले, याठिकाणी निर्माण केलेल्या ५ रेल्वे अंडर पास ब्रिजचे लोकार्पण आणि तरडगांव आणि तडवळे येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांचा शुभारंभ होत आहे. महाराष्ट्राला आणि सातारा जिल्ह्यासाठी आजचा हा दिवस निश्चितच भारतीय रेल्वेसेवा (Indian Railways) संबंधी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे भाजप खा. उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हंटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असून त्यांनी सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विकासकामांचा उल्लेख केला आहे. सध्या महाराष्ट्रात 2274 कोटींची रेल्वेची विविध विकास कामे प्रगती पथावर आहेत. आमच्या सह अन्य मान्यवरांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातुन, यंदाच्या रेल्वे अंदाजपत्रकामध्ये मुलभुत सुविधांसाठी 15554 कोटींची भरीव तरतुद उपलब्ध करून मिळवताना, महाराष्ट्रातील एकूण 56 रेल्वेस्टेशन्सचा समावेश अमृत भारत योजनेमध्ये (Amrit Bharat Yojana) करण्यात आला आहे.

या 56 रेल्वेस्टेशन्समध्ये पुणे विभागातील 16 रेल्वेस्टेशन्सपैकी, सातारा जिल्हयातील फार जुने समजले जाणारे वाठार रेल्वे स्टेशनसह विकसनशील कराड आणि लोणंद रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या वाट्याला यंदाच्या अंदाज पत्रकात 15554 कोटींची तरतुद झाली आहे. हि बाब आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.

दळणवळणाची गतीमान आणि अधिक सुरक्षित सुविधा म्हणून भारतीय रेल्वे कडे पाहीले जाते. भारतीय रेल्वे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही वेगवेगळया आव्हानांना सामोरे जात अधिकाधिक दर्जेदार सुविधा पुरवण्याकडे कटाक्ष पुरवत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी साहेब यांना अपेक्षित असलेली स्वयंनिर्भरता आणि लोकहित यांच्या समन्वयामधुन ज्या ज्या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज आणि अंडर ब्रिजची आवश्यकता आहे तेथे त्यांची उभारणी करण्याचे उदिष्ट रेल्वेप्रशासन व रेल्वे मंत्रालयाने ठेवलेले आहे.

सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन, पिंपोडे, शिरढोण, जरंडेश्वर आणि कराड तालुक्यातील पार्ले याठिकाणी रेल्वे अंडर ब्रिज करीता आम्ही सूचना केलेल्या होत्या त्याची पूर्ती याठिकाणच्या कामांचे लोकार्पण होत असताना होत आहे ही अधिक समाधानाची बाब आहे. तसेच तरडगांव व तडवळे येथील ओव्हरब्रिजच्या कामाचाही कोनशिला अनावरण समारंभ होत आहे. या ओव्हर आणि अंडर ब्रिजेसमुळे रेल्वे सह रस्ते वाहतुक सुविधा अधिक गतीमान होण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे. पुणे ते मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरी करण आणि विद्युतीकरण या दोन्ही बाबी अंतिम टप्यातील प्रगतीपथावर आहेत.

सातारा रेल्वेस्टेशनचा कायापालट अमृत भारत योजनेमधुन यापूर्वीच करण्यात आला असून, मराठा साम्राज्याच्या राजधानी साताऱ्याला शोभेल अशी चित्रकृती रेखाटलेली नवीन इमारत उभारण्यात आली आहे. तसेच अमृत योजनेतील सर्व सुविधा याठिकाणी सुरु करण्यात आलेल्या आहेत. सातारवरुन मुंबईला जाणारी नवीन सातारा व्हाया मिरज- पंढरपूर-मुंबई आणि मुंबई-पंढरपूर- व्हाया मिरज-सातारा अशी नवीन रेल्वे आमच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर करण्यात आली आहे. लवकरच त्याचा शुभारंभ होत आहे.

कराड- सातारा – मुंबई अशी नवीन पॅसेंजर देखिल सुरु करण्याकरीता आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातुन आम्ही कायमच लोकोपयोगी आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय दृष्टीकोनामधुन कार्यरत राहीलो आहोत. आज शुभारंभ आणि लोकार्पण होणाऱ्या कामांबाबत आम्ही रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव, रेल्वेचे जी.एम. रामचरण यादव, पुणे डिआरएम इंदू दुबे तसेच अन्य कमर्शियल आणि टेक्नीकल अधिकारी-कर्मचारी यांचे अभिदंनपर आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राला आणि सातारा जिल्ह्याला आज दि. 26 फेब्रुवारी हा दिवस निश्चितच रेल्वेसेवा संबंधी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे खासदार उदयनराजे यांनी म्हंटले आहे.