सातारा जिल्ह्यात 43 हजार 500 वृक्षांची लागवड; ‘इतक्या’ ग्रामपंचायतींनी केले उद्दिष्ट पूर्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिन ते जागतिक निसर्ग संवर्धन दिन या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत विविध ग्रामपंचायतींनी 43 हजार 501 वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये 105 ग्रामपंचायतींचे किमान 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावरून सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतींनी परिपूर्ण नियोजन केले. काही ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवड मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोहीम काळात सातारा 3 हजार 135, कोरेगाव 3 हजार 261, खटाव 2 हजार 250, माण 3 हजार 442, फलटण 12 हजार 722, खंडाळा 355, वाई 2 हजार 654, जावली 4 हजार 753, महाबळेश्वर 1 हजार 741, कराड 8 हजार 44, पाटण 1 हजार 144 अशी मिळून 43 हजार 501 झाडे लावण्यात आली आहेत. दरम्यान, किमान 100 झाडे लागवडीचे सातारा 12, कोरेगाव 10, खटाव 4, माण 15, फलटण 27, खंडाळा 1, वाई 1, जावली 8, महाबळेश्वर 4, कराड 22, पाटण 1 अशा केवळ 105 ग्रामपंचायतींनी उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

993 ग्रामपंचायतींकडून दुर्लक्ष

सातारा जिल्हा परिषदेकडून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान करण्यात आले. मात्र, सातारा जिल्ह्यातील सातारा 176, कोरेगाव 93, खटाव 109, माण 66, फलटण 39, खंडाळा 52, वाई 19, जावली 93, महाबळेश्वर 46, कराड 87, पाटण 213 अशा मिळून 993 ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीला हरताळ फासला आहे. या ग्रामपंचायतींनी मोहीम काळात एकही झाड न लावल्याचे समोर आले आहे.