‘नवीन महाबळेश्वर’चा आराखडा प्रसिद्ध; ‘इतक्या’ गावांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जावळी, महाबळेश्वर, सातारा आणि पाटण या चार तालुक्यांतील २३५ गावांचा समावेश असलेली नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रकल्पाचे विशेष प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची नियुक्ती असून, त्यांच्या वतीने हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

टाऊन प्लॅनिंग, जिल्हाधिकारी, एमएसआरडीच्या नागठाणे कार्यालयात हा आराखडा पाहण्यासाठी उपलब्ध आहे. २००१ पासून प्रस्तावित असलेला हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जन्मभूमी क्षेत्राचा पर्यावरण संवर्धनासह इको टुरिझमकरिता एकात्मिक नियोजन व विकास करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. प्रकल्पामुळे ११५३ चौरस किलोमीटर क्षेत्राचा जैव विविधतेच्या पर्यावरण संवर्धनासह संरक्षित व शाश्वत विकास होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महामंडळाने संविधानिक प्रक्रियेचा अवलंब करून केंद्र व राज्य शासनाचे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र कोयना वन्य जीव अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, संवर्धन क्षेत्र, हेरिटेज क्षेत्र आणि सातारा प्रादेशिक योजनेतील नियोजन आणि विकासासाठीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार या क्षेत्रासाठी ‘पर्यावरण संवर्धनाभिमुख व पर्यटन समावेशक विकास योजना’ तयार केली असून, ती नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.