सातारा प्रतिनिधी | भाजप जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो लावण्यात आले आहेत. उदयनराजे समर्थक व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यामध्ये वाद पेटला असताना अशात दोन्ही राजेंचे फोटो लावण्यात आल्याने त्यांच्या या फोटोंची चर्चा सद्या सुरू आहे.
आमदार जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष असताना, विसावा नाका येथे भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आ. गोरे यांची छायाचित्रे कार्यालयात लावण्यात आली होती. आ. गोरे यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यालयाची सजावट करण्यात आली होती. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व आ. जयकुमार गोरे यांच्यात राजकीय वाद पेटला आहे.
उदयनराजे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ नये, अशी भूमिका आ. गोरे यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट अनिल देसाई यांनी केला होता. त्यानंतर धैर्यशील कदम यांनी उदयनराजे समर्थकांचा ‘बगलबच्चे’ असा उल्लेख केल्याने, उदयनराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण धस्के यांनी पत्रक काढून या प्रकाराचा निषेध केला होता. जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची छायाचित्रे का नाहीत, असा सवाल जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारला असता होता. त्यावर, या कार्यालयात मी कोणताही बदल केलेला नाही. कार्यालयाची सजावट आ. गोरे यांच्या जिल्हाध्यक्षदाच्या काळातील आहे, असे उत्तर कदम यांनी दिले होते.