सातारा प्रतिनिधी । दहावी, बारावीचे निकाल झाल्यानंतर लगबग सुरू होते ती महाविद्यालयाच्या पुढील प्रवेशाची. आता जवळपास सर्वच प्रवेशासाठी विविध शासकीय दाखले त्यामध्ये उत्पन्न, जातीचा, डोमासाईल, EWS, अल्पभूधारक शेतकरी असे दाखले लागत असतात. फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी तब्बल 3 दिवसांमध्ये 2 हजारहून अधिक दाखले जारी केले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ आहे. अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती नसते आणि अशावेळी दाखले काढण्यासाठी धावपळ होते. कारण प्रवेशासाठी सुद्धा विद्यालयांद्वारे ठराविक कालावधीचा अवधी देण्यात येतो. अशावेळी जरी धावपळ झाली तरी सुद्धा वेळेत ऍडमिशन व्हावे व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना तत्काळ दाखल्यांचे वाटप
फलटण तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी फलटणला येत असतात. त्यांना दहावीनंतर पुढील शिक्षण घेता यावे म्हणून अनेक दाखल्यांची आवश्यकता भासते. विशेषकरून महाविद्यालय प्रवेशाच्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक विविध दाखल्यांची मागणी केली जाते. त्यामुळे यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना तत्काळ दाखल्यांचे वाटप केले असल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.