सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील खुंटे, जिंती परिसरामध्ये चोरी करण्यापूर्वी चोरट्याकडून परिसराची ड्रोनने पाहणी केली जात असल्याचा प्रकार वारंवार केला जात आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर फलटण पोलिसांनी सुद्धा अनोखी शक्कल लढवली आहे. फलटण पोलीस प्रशासनाकडे शासकीय ड्रोन कॅमेरा दाखल झाला असून ज्या भागामध्ये ड्रोन द्वारे चोरीसाठी टेहळणी केली जात आहे त्या भागामध्ये सुद्धा ड्रोन द्वारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांना ड्रोनद्वारे कोणी रेकी करताना दिसल्यास 9823562255 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गेल्या आठवडाभरापूर्वी फलटण तालुक्यात चोरट्याकडून ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जात असल्याच्या घटना दिसून आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फलटण शहरात कोठे पहारेकरी आहेत? कोठे गस्त घालत आहेत? तर कोणत्या ठिकाणी कोणीच नाही; याची पाहणी चोरटे ड्रोनद्वारे करून मग त्या ठिकाणी जाऊन त्यांना मारण्याचा बेत आखत.
अशा प्रकारच्या हायटेक चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून सुद्धा उपाय कर्णकंस सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सुद्धा ग्रामीण भागामध्ये गस्त घालत आहेत. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक (मो. 9823562255) हे शासकीय ड्रोन घेऊन तयार असून जर कुठे ड्रोन दिसल्याचे कळल्यास तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केले आहे.