सातारा प्रतिनिधी । फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला ट्रॅक्टर चोरीचे ७ व मोटार सायकल चोरीचा १ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांनी अंतर जिल्हा टोळीतील तिघा जणांना अटक करून त्यांच्याकडून एकुण ६४ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुरज शंकर मदने (वय ३५), निकेत महेश जाधव (वय २०, दोघे रा. खडकवस्ती, सगोबाचीवाडी, पोस्ट पणदरे, ता. बारामती, जि. पुणे), राजेंद्र मारुती जाधव (वय ३०, रा. ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय दिपक राजेपांढरे, (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीचा सुमारे ६ लाख रुपये किंमतीचा, महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर सोमंथळी, ता. फलटण येथुन दि. १५/०९/२०२४ रोजीचे सायंकाळी ५.०० ते दि. १६/०९/२०२४ रोजीचे सायंकाळी ७.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदरचा गुन्हा हा रात्रीच्या वेळी घडला असल्यामुळे सुरुवातीला पोलीसांकडे आरोपींबाबत काहीही माहिती अगर धागेदोरे नव्हते.
तक्रारदार यांना सुद्धा संशयितांबाबत काहीही सांगता येत नव्हते. अलिकडच्या काळामध्ये फलटण तालुका व परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरीच्या अनेक घटना सातत्याने घडत होत्या. पोलीसांनी या सर्व घटनांचा बारकाईने व सखोल अभ्यास केल्यावर असे निदर्शनास आले की, संशयित आरोपींनी पहिल्यांदा चोरी करावयाच्या ट्रॅक्टरचे पार्किंगचे ठिकाण व ट्रॅक्टरची चोरी केल्यानंतर तो घेऊन जाण्याचा मार्ग याची रेकी करुन नंतर ट्रॅक्टरच्या चो-या केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीसांनी फलटण तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या चो-या झालेल्या ठिकाणांवरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे फुटेज व तांत्रिक माहितीचा अभ्यास करुन संशयित आरोपी १) सुरज शंकर मदने व २) अनिकेत महेश जाधव यांना निष्पन्न करुन त्यांना अटक केले.
त्यांच्याकडे ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची माहिती दिली. परंतु नंतर पोलीसीखाक्या दाखवताच त्यांनी त्यांचा साथीदार राजेंद्र मारुती जाधव यांचे मदतीने ट्रॅक्टर चोरीच्या एकुण ०७ गुन्ह्यांची व मोटार सायकल चोरीच्या ०१ गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपी सुरज शंकर मदने याच्यावर चोरी, फसवणुक, पुरावा नाहीसा करणे, चोरीच्या उद्देशाने एकत्र जमणे अशा प्रकारच्या एकुण १८ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग निष्पन्न झालेला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गोपाल वदने, पोलीस अमंलदार शांतीलाल ओंबासे, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, रशिदा पठाण व कल्पेश काशिद यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे हे करीत आहेत.