सातारा प्रतिनिधी | फलटण ग्रामीण पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीला गावठी कट्टयासह जेरबंद केले. त्याच्याकडून एक जिवंत काडतूस तसेच एक रिकामी पुंगळीही जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा धुळदेव येथील असून त्याच्या नावावर विविध गुन्हे नोंद आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक जिवंत काडतूस तसेच एक रिकामी पुंगळी बाळगल्या प्रकरणी रेकॉर्डवरील आरोपी अजय कल्लू बेनकर (रा. बावीस फाटा गणेशशेरी, धुळदेव, ता. फलटण) याला अटक करण्यात आली आहे. तर फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय बेनकर हा विडणी, ता. फलटण येथे बसथांब्याजवळ उभा आहे.
त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा असून तो विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक महाडिक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जी. बी. मदने, हवालदार नितीन चतूर, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हणुमंत दडस, शिवराज जाधव यांना कारवाईची सूचना केली. त्यानंतर पथक घटनास्थळी गेल्यावर संशयित अजय बेनकर हा पळून जाऊ लागला. मात्र, हवालदार श्रीनाथ कदम यांनी झडप मारुन त्याला पकडले. त्यावेळी त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचा कट्टा, खिशात एक जिवंत काडतूस, रिकामी पुंगळी मिळून आली.
पोलिसांनी अजय बेनकर याच्याकडे कट्याबाबत चौकशी केल्यावर परप्रांतिय कामगाराकडून ते घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी गावठी कट्ट जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.