सातारा प्रतिनिधी | फलटण शहरात गणेश चतुर्थी दिवशी अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या मिरवणुका काढल्या. परंतु मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या १० डीजे मालकांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे डीजे मालकांचे धाबे दणाणले आहेत.
फलटणचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, हवालदार चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके यांनी डीजे मालकांवर कारवाईचा बडगा उगारत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 36(इ-अ)/134 नुसार कारवाई केली.
याप्रकरणी डीजे मालक शामराव अहिवळे (स्वारगेट पुणे), अथर्व चौगुले (कात्रज पुणे), शोएब आतार, तुकाराम शिंदे, योगेश पोंदे, प्रदीप जगताप, श्यामकुमार काकडे, राजेंद्र जाधव (लोणंद), अभिषेक जगदाळे (दहिवडी), ऋतुराज सरगर (सातारा) यांच्यासह अनेक मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. डीजेचा आवाज नियंत्रित ठेवावा. मंडळांनी विधायक उपक्रम राबवावेत, असे आवाहन फलटण शहर पोलिसांनी केले आहे.