फलटणला दीपक चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज; संजीवराजेंसह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी- बेडके, सह्याद्री कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास नाळे, नागराज जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन करीत आमदार चव्हाण यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

आमदार चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “गेल्या 3 पंधरा वर्षांत आमदार म्हणून मी माझे कर्तव्य निश्चितपणे पार पाडले आहे. सर्वसामान्य घटकांच्या अपेक्षा प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आपला प्रतिस्पर्धी उमेदवार कुणाच्याही चिन्हावर असला, तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमचा विजय निश्चित आहे.

विधानसभेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार निर्मिती, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, कालव्यांची कामे यासारख्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक चांगल्या प्रमाणात केली आहे. तालुक्यात ज्या भागात पाणी नव्हते, तो भाग सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. तीनही वेळेला मला जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे.”