सातारा प्रतिनिधी । जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी ७ हजाराची लाच घेताना फलटण भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. इब्राहिम मोहम्मदशफी मुलाणी, असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांची कोरेगाव (ता. फलटण) येथे वडिलोपार्जीत शेतजमीन आहे. त्यातील एकत्रित गट नं. ९० ची दि.१७ जानेवारी २०२४ रोजी मोजणी करण्यात आली होती. मोजणी हद्द कायम करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने १० हजार रूपये लाचेची मागणी केली होती.
यासंदर्भात तक्रारदार शेतकऱ्याने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाच मागितल्याचे पडताळणीत आढळून आले. आज (दि. २९ जानेवारी) कोरेगाव (ता. फलटण) येथील तक्रारदाराच्या मोजणी गटाचे शेजारीच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ लिपिकास रंगेहाथ पकडले.
फलटण तालुक्यात चार दिवसात घडलेली लाचखोरीची ही दुसरी घटना आहे. २५ जानेवारी रोजी वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्राची सातबाराला नोंद करण्यासाठी १३ हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी आणि महिला तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले होते. लाचखोरीच्या घटनांमुळे फलटण तालुक्यातील प्रशासनाची मोठी नाचक्की झाली आहे.