शरद पवारांसोबत फलटणच्या शेतकऱ्यांनी घेतली मोदींची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

0
26
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या समवेत वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत अहिरेकर यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी शेतकऱ्याची झालेल्या चर्चेनंतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले.

राज्यातील फळबागा आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी केंद्र शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना आपल्या सोबत सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या वाठार निंबाळकर येथील तरुण, कष्टाळू शेतकऱ्याची निवड करुन त्यांना आपल्या सोबत पंतप्रधानांच्या भेटी साठी नेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीसाठी वेळ देवून खा. शरद पवार व चंद्रकांत अहिरेकर या शेतकऱ्याशी मनमोकळी चर्चा करताना त्याच्या व्यथा वेदना समजावून घेत त्यावर योग्य तोडगा काढण्याचे किंबहुना फळ उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्याचे चंद्रकांत अहिरेकर यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सतत बदलते हवामान, फळ बागांवर होणारा रोग किडीचा प्रादुर्भाव, योग्य बाजार पेठ मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित दर न मिळाल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा याबाबी खा. शरद पवार आणि चंद्रकांत अहिरेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समोर मांडून केंद्र शासनाने फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रामुख्याने फळ निर्यातीसाठी योग्य सहकार्य व मार्गदर्शन करुन रास्त दर मिळण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.