सातारा प्रतिनिधी । नीरा उजवा कालव्याचे अपूर्ण राहिलेले सिंचन आवर्तन पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी फलटणसह सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी नुकतीच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला असंतोष व तक्रारीचा पाढा वाचून दाखवलाआणि सिंचन आवर्तन त्वरित सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, पांडुरंग वाघमोडे, माणिक वाघमोडे, दादाराजे घाडगे, माऊली पाटील, दत्तात्रय टापरे, सोमनाथ पिसे, रावसाहेब पांढरे, संतोष वाघमोडे किरण पवार, राजेंद्र गायकवाड, सुरेश बर्गे, वसंतराव अडसूळ उपस्थित होते.
जिल्ह्यातील नीरा उजवा कालव्याचा उन्हाळी हंगाम सिंचन आवर्तन सुरू असताना अचानकपणे दि. ११ मे रोजी कालवा बंद केल्यामुळे फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या चार तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांचे सिंचन अपूर्ण राहिले. परिणामी त्यातून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पाणी टंचाईही तीव्र प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
‘या’ आहेत महत्वाच्या मागण्या
हक्काचे शिल्लक पाणी अंदाजे सव्वा टीएमसी आणि पालखीसाठी राखीव ठेवण्यात आलेले ०.८५ टीएमसी पाणी सोडून नीरा उजवा कालव्याचे राहिलेले आवर्तन पुन्हा सुरू करावे व उद्धट बॅरेजमध्ये शिल्लक असणारे पाणी नीरा नदीमध्ये सोडावे, अशी मागणी कपोले यांच्याकडे करण्यात आली आहे.