सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई पंचायत समितीच्या वतीने मांढरदेव यात्रेदरम्यान प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यावसायिक व विक्रेत्यांवर धडक कारवाईची राबविण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पथकामार्फत सर्व दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 8 ते 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
संपूर्ण जगाला भेडसावणारी प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याची जाणीव घेऊन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कचरामुक्त सातारा जिल्हा करण्याचा ध्यास घेतलेला आहे. सातारा जिल्ह्यात एकल प्लास्टिक वापरावर बंदी करण्यात आलेली असून, सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे फलक लावण्यात आलेले आहेत. प्लास्टिक व्यवस्थापन करण्याकरिता गावस्तरावर प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आलेली आहेत.
मांढरदेव येथे प्लास्टिक विरोधी कारवाईवेळी पाणी व स्वच्छता विभागाचे श्री रोहित जाधव, तालुका सल्लागार पंचायत समिती वाई, श्री संतोष अनगळ, श्री शहाजी बोभाटे ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ही मोहीम स्वच्छ भारत मिशनच्या धोरणांना अनुसरून राबविण्यात आली आहे, ज्याचे मुख्य उद्दिष्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न साकार करणे आहे.