कराड प्रतिनिधी | पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड येथील खरेदी-विक्री पेट्रोल पंपासमोरील पादचारी पूल बुधवारी रात्री पाडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. हा पादचारी पुल दोन टप्प्यात पाडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी आज कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा या ठिकाणीच्या वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. सायंकाळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी या वाहतुकीतील बदला संदर्भात आदेश जारी केला आहे.
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या सूचनेनुसार कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व त्यांच्या टीमने बुधवारी रात्री 11 ते गुरुवारी पहाटे 5 आणि शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 5 या दरम्यान महामार्गावरील तसेच कराड शहर व मलकापूर येथील या वाहतुकीतील बदला संदर्भात योग्य नियोजन केले आहे.
महामार्गावरील हा पादाचारी पूल बुधवारी रात्री 11 वाजता पाडण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याने महामार्गावरील सातारा पुणे बाजूने कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. ही वाहतूक कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा चौक, मार्केट यार्ड बैल बाजार रोड, मलकापूर तसेच मलकापूर शहराच्या बाहेरून मळाईदेवी पतसंस्थेपर्यंत असणाऱ्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. बुधवारी रात्री 11 ते गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे.
बुधवारी रात्री पादचारी पुलाचा डाव्या बाजूचा निम्मा भाग पडण्यास सुरू करण्यापूर्वी हा वाहतुकीत बदल असणार असून कोल्हापूर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक मोठी वाहने (लांब ट्रक, एक्सल) वगळता मलकापूर शहरातून पुढे मळाईदेवी पतसंस्थे नजीक हायवेवर बाहेर पडतील तर मोठी वाहने (लांब ट्रक, एक्सल) वाहने मलकापूर शहरातून मलकापूर फाट्या वरून हायवेवर येतील. या दरम्यान प्रत्यक्ष पूल पाडण्याचे काम सुरू असताना कोल्हापूर कडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक 15 ते 20 मिनिटांसाठी खरेदी विक्री पेट्रोल पंपाजवळ थांबवली जाणार आहे.
दरम्यान पादचारी पुलाचा निम्मा भाग रात्रीत पाडून झाल्यानंतर गुरुवारी पहाटे 5 नंतर कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक महामार्गावरून नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. शुक्रवारी रात्री 11 नंतर पादचारी पुलाचा राहिलेला अर्धा भाग पाडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यावेळी कोल्हापूर कडून सातारा पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक खरेदी-विक्री पेट्रोल पंपा समोर असणाऱ्या वळण मार्गातून कराड कडे उलट दिशेने कोल्हापूर नाका येथून पुन्हा सातारा पुणे लेन वर वळवली जाणार आहेत. शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी पहाटे 5 पर्यंत वरील मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
दरम्यान बुधवारी व शुक्रवारी रात्री कोल्हापूर नाका, संगम हॉटेल, दुर्गा हॉटेल व रिमांड होम परिसरातील वाहनधारकांनी, नागरिकांनी चालत अथवा वाहनातून महामार्गावर येऊ नये तसेच मलकापूर शहरात मलकापूर फाटा ते बैल बाजार रोड पर्यंतच्या रस्त्यावर वाहने पार्क करू नयेत असे आव्हान वाहतूक शाखेने केले आहे.
डी पी जैन कंपनीच्या वतीने हा पादचारी पुल पाडण्यास सुरुवात केल्यानंतर कंपनीच्या वतीने वाहतूक शाखेच्या मदतीने खरेदी विक्री पेट्रोल पंप व कोल्हापूर नाका येथे वळण मार्गावर वाहतुकीची व्यवस्था सुरक्षितरित्या राबवली जाणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी, नागरिकांनी वाहतुकीत केलेला बदल व दिलेल्या सूचना पाळाव्यात असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.