कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
जगातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा प्रयागराजच्या (Prayagraj) संगमावर सुरु झाला आहे. 4 हजार हेक्टर जमिनीवर महाकुंभचा मेळा (Mahakumbh Mela) आयोजित झाला आहे. दरम्यान, या महाकुंभ मेळ्यासाठी 13 हजार विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या असून मध्य रेल्वेने (Central Railway) सुरु केलेल्या कुंभमेळा विशेष बळी-प्रयागराज-तुंडला व तुंडला-प्रयागराज-हुबळी रेल्वे गाड्यांना सांगली (Sangli), किर्लोस्करवाडी (Kirloskarwadi) व कराड (Karad) या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी रोजी हुबळी-बनारस-हुबळी (क्र.07383) ही विशेष एक्स्प्रेस मिरजमधून दुपारी 1:35 वाजता धावणार आहे.
मध्य रेल्वेकडून ज्यावेळी ही विशेष गाडीची घोषणा करण्यात आली. त्यावेळी सांगली, किर्लोस्करवाडी व कराड या तिन्ही स्थानकांना थांबा देण्यात आला नव्हता. प्रवाशी संघटनांकडून थांबा देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. त्यानंतर संघटनाच्या मागणीची दखल मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतली.
“महाकुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा,” असं अवाहन रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, मधुकर साळुंखे, वाय. सी. कुलकर्णी, पंडितराव कराडे, श्रीकांत माने, जयगौंड कोरे, पांडुरंग लोहार यांनी केलं आहे.
सातारा, सांगली जिल्ह्यात 4 ठिकाणी थांबा
महाकुंभ मेळाव्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्स्प्रेसला सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेचे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी (कराड), शिवनाथ बियानी (कोल्हापूर), ॲड. विनित पाटील (सातारा) यांनी ही गाडी मंजूर करुन घेतली आहे.
सातारा, कराडमध्ये एक्स्प्रेसला थांबा
महाकुंभ मेळाव्यासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष एक्स्प्रेस दुपारी 02:30 वाजता किर्लोस्करवाडी, दुपारी 3 वाजता कराड आणि सातारा येथून दुपारी 04:05 वाजता निघेल. प्रयागराज येथे अनुक्रमे 15 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2025 रोजी रात्री 08:30 वाजता पोहोचेल.
कोणत्या स्थानकावर किती वाजता येणार?
हुबळी-प्रयागराज-तुंडला विशेष एक्सप्रेस (गाडी क्र. ०७३७९) २० जानेवारीला हुबळीहून सुटेल. सांगली स्थानकावर सकाळी ८.५० वाजता पोहचणार आहे. त्यानंतर किर्लोस्करवाडीत सकाळी ९.२३ वाजता तर कराडला सकाळी ९.५७ ला पोहचणार आहे. प्रयागराजला ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६:३५ पोहोचेल.
गाडी क्र. ०७३८१ : हुबळी-प्रयागराज-तुंडला विशेष एक्सप्रेस ६ फेब्रुवारी रोजी हुबळीहून सुटेल. निश्चित वेळेत ती सांगली, किर्लोस्करवाडी व कराड स्थानकावर येईल.
गाडी क्र. ०७३८० : तुंडला-प्रयागराज-हुबळी एक्सप्रेस २४ जानेवारीला प्रयागराजहून पहाटे १ वा सुटेल. २५ जानेवारीला कराडला सकाळी १०.५७, किर्लोस्करवाडीत सकाळी ११.२८ला तर सांगलीत सकाळी ११.५७ ला पोहचेल.
गाडी क्र. ०७३८२ : तुंडला-प्रयागराज-हुबळी १० फेब्रुवारी राेजी प्रयागराजहून पहाटे १ वा सुटेल. दुसऱ्या दिवशी निश्चित वेळेत कराड, किर्लोस्करवाडी व सांगलीला थांबेल.
विशेष रेल्वे गाडीची प्रवाशांनी लाभ घ्यावा : गोपाल तिवारी
प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वेकडून सांगली, किर्लोस्करवाडी आणि कराड रेल्वे स्थानकास या विशेष गाडीच्या थांब्यास मंजुरी देण्यात आली असल्याची प्रतिक्रिया मध्य रेलवे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
‘असं’ आहे परतीचं वेळापत्रक
प्रयागराज येथून 17 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च 2025 रोजी ही विशेष एक्स्प्रेस सकाळी 08:55 वाजता परतीच्या प्रवासासाठी निघेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07:40 वाजता ती मिरज जंक्शन येथे पोहोचेल.