सातारा प्रतिनिधी । अनधिकृत बांधकामाविरोधात सातारा तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे आत्मक्लेश आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाटीदार रिसॉर्ट आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सला २ लाख ५७ हजार ६०७ रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मोरे यांनी म्हंटले की, सातारा येथील औद्योगिक वसाहतीत पी ९४ येथे पाटीदार रिसॉर्ट आणि कमर्शिय कॉम्प्लेक्स आहे. या भूखंडावरील इमारत बांधण्यात आली असून त्याचा पूर्णत्वाचा दाखला न घेणे, मंजूर आराखड्यापेक्षा जास्त बांधकाम करणे, पार्किंगच्या जागेत विना परवाना बांधकाम करणे याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच याबाबत दि. २३ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु त्याची प्रशासनाकडून दखल न घेतल्याने स्वतः तहसीलदार कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार १८ फेब्रुवारी रोजी आत्मक्लेश आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत अतिरिक्त बांधकामासाठी १ लाख रुपये, अनधिकृत बांधकामासाठी १ लाख ५७ हजार ६०७ रुपये असा एकूण २ लाख ५६ हजार ६०७ असा दंड ठोठावण्यात आला.
तसेच सात दिवसांच्या आत हा दंड कार्यकारी अभियंता, मऔविम विभाग कोल्हापूर येथे डीडीने भरणा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जर मुदतीत दंड न भरल्यास जानेवारी २०२५ च्या पाणी देयकामध्ये ही रक्कम दाखवून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त बांधकाम आणि बदललेल्या आराखडयानुसार सुधारित इमारत पूर्णत्वाचा दाखला घेणे आवश्यक असल्याचेही नोटीसीस म्हटले आहे. वरील सर्व बाबींची पूर्तता न केल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत कारवाई केली : सुशांत मोरे
पोलिस, एम आय डी सी सातारा आणि महसूल प्रशासनाने आत्मक्लेश आंदोलनाची तातडीने दखल घेत कारवाई केल्याने प्रशासनाचे आभार मानले असून अंमलबजावणी योग्य पध्दतीने केली जावी, अशी मागणी केली असल्याची माहिती सुशांत मोरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.