सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातुन खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या सातारा – पुणे महामार्गावरील खंबाटकी घाट हा अतिशय अवघड असा घाट आहे. या घाटात अपघात कमी होत असले तरी एक धोका कायम प्रवाशांना वाटत असतो. घाटातील उंच डोंगरवरून कधी दरड कोसळून खाली येईल, हे सांगता येणार नाही, याची भीती वाहनचालकांना वाटते. घाटातील बोगदा ओलांडल्यावर पहिल्याच वळणावर डोंगर- टेकडीवरील काही छोटी दगड-गोटे वारंवार महामार्गावर येत असल्याने वाहनांच्या अपघात होऊ शकतो. या घाटातून प्रवाशांना पावसाळ्यात कायम जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
खंबाटकी घाटात अनेकवेळा अवजड वाहनांचे ब्रेक फेल होणे, वाहनांची एकमेकांना टक्कर होणे, पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होणे अशा घटना घडत असतात. या घटनांकडे संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात असतो. साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर लगेच पहिल्या वळणावर एक मोठी टेकडी आहे. यावरील लहान-मोठे दगड हे सतत महामार्गावर येत असतात. हे दगड पाऊस पडल्यानंतर किंवा जोरदार वादळ वारा सुटल्यानंतर नजरेस पडतात. मात्र, एखाद्या वेळेस न दिसल्यास अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महामार्ग प्राधिकरणाने या डोंगरकड्यावर लोखंडी जाळी लावणे गरजेचे आहे, तसेच यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी वाहन चालकांमधून केली जात आहे. मात्र, अनेक वर्षे झाली याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
खंबाटकी घातातून जातात काय पाहाल?
मुंबई- बेंगलोर महामार्गावर साताऱ्याजवळ खंबाटकी हा घाट आहे. या घाटावर आल्यानंतर या ठिकाणी असलेले खामजाई मंदिर हे अतिशय प्राचीन असे मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी डोंगरात खोदलेले खांब टाक्या असून या ठिकाणी वर्षभर पाणी असते. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा प्राचीन घाट मार्ग असून या घाटाच्या अगदी जवळ असणाऱ्या शिरवळ आणि पारगाव खंडाळा या ठिकाणी असणाऱ्या प्राचीन लेण्या खूप पाहण्यासारखे आहेत.
दररोज होतो सुमारे एक लाख वाहनांचा प्रवास
खंबाटकी घाटाचे 8 किलोमीटर अंतर चढून जाण्यास सुमारे ४५ मिनिटांचा कालावधी जातो. तर पुण्याकडे जाताना सध्या एक बोगदा अस्तित्वात आहे. तेथून एकेरीच वाहतूक होते. त्यासाठी साधारण १५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यातच प्रतिदिन 55 हजार असणाऱ्या वाहनांची संख्या आता एक लाखवर पोहोचली आहे.