सातारा प्रतिनिधी | उदयनराजेंनी मला बहिण मानलंय. छत्रपतींचं घर हे माहेर आणि उदयनराजे पाठिराखे असल्यामुळे मला कशाचीच चिंता नाही, असं वक्तव्य माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी साताऱ्यातील नक्षत्र महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केलंय. दरम्यान, पंकजाताई तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी आहे. तुमच्यापर्यंत पोहचण्याच्या अगोदर त्यांना मला सामोरे जावे लागेल, असा इशारा उदयनराजेंनी पंकजा मुंडेंच्या पक्षांतर्गत विरोधकांना दिला.
मुंडे साहेबांच्या आठवणी उर्जा देतात
दमयंतीराजेंनी मुंडे साहेबांच्या आठवणी सांगितल्या. त्यांचे कौतुक केले. खरंतर बाबांच्या आठवणीच मला ऊर्जा देतात. मुंडे साहेबांनी राजेंवर प्रेम केलं आणि मुंडे साहेब जाऊन दहा वर्षे झाली तरी उदयनराजे त्यांच्यावर प्रेम करतात. मला पण माहेरी जावं, कोणावर तरी जबाबदारी टाकावी, असं वाटतं. छत्रपती उदयनराजे यांच्यावर मी अवलंबून आहे, असं वाटतं. त्यामुळेच सातारला आल्यानंतर मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
छत्रपती उदयनराजे माझे पाठिराखे
लग्न झाल्यानंतर मुंबईवरून मी पुण्याला शिफ्ट झाले. त्यावेळी छत्रपती उदयनराजेंनी पुण्यात जेवण ठेवलं होतं आणि मुंडे साहेबांना त्यांनी सांगितलं की मुलीची काळजी करायची नाही. मी तिचा पाठीराखा आहे, असा शब्द उदयनराजेंनी दिल्याची आठवण पंकजा मुंडेंनी सांगितली. तसेच शिवशक्ती परिक्रमेला केवळ उदयनराजेंमुळेच उंची मिळाली. जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि जातीपातीच्या भिंती बांधून स्वतःची सोय करणाऱ्यांनी एका छत्रपतीचं राजासारखं मन बघावं, असं आवाहन त्यांनी केलं.
उदयनराजे पाठीशी असल्याने चिंता नाही
उदयनराजेंनी मला बहिण मानलं. कारण आमचे संबंध हे राजकारणाच्या पलिकडचे आहेत. राजकारणात काम करताना उदयनराजेंनी सच्चा माणूस, अशी आपली एक इमेज बनवली आहे. उदयनराजेंनी काही केलं तर ती स्टाईल होते. एकदम सच्चा, मनाचा मोकळा माणूस म्हणून ते दबंग ठरतात. उदयनराजेंसारखा भाऊ पाठीशी असल्यावर मला कशाचीही चिंता नाही, असे पंकजा मुंडेंनी सांगितलं.
माहेरात येऊन लाड करून घेतले
श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे माझ्या नणंद असल्याचं सांगून पंकजा म्हणाल्या की, दमयंतीराजे आणि उदयनराजेंच्या मध्ये बसले आणि माझे लाड करून घेतले. छत्रपतींचं घर हे माहेर असल्यामुळे कशाचीच चिंता नाही. हे ऋणानुबंध असेच कायम राहावेत आणि पिढ्यान पिढ्या आपण एकमेकांशी प्रेमाचे भाव ठेवावेत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
पंकजाताईंना मंत्रिपद मिळणारच
खासदार उदयनराजे म्हणाले, पंकजाताई केवळ साताराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचं माहेर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुमच्या पर्यंत पोहचण्याच्या अगोदर त्यांना मला सामोरे जावे लागेल. पंकजाताईंना मंत्रिपद मिळावं, अशी महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे आणि त्यांना ते मिळणारच, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.